मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 हे अतिशय भयानक जात आहे, मुंबई ना सामने जिंकत ना मुख्य खेळाडूंकडून चांगली कामगिरी होत आहे. त्यात खेळाडू दुखापतींनी त्रस्त आहेत. आधी रोहित शर्माला दुखापत झाली, त्यानंतर अथर्व अंकोलेकर संपूर्ण हंगामाला मुकला. अथर्व अंकोलेकर मुंबईचा 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. अथर्वच्या जागी मुंबईने क्रिश भगतला संघात समाविष्ट केले. कोण आहे क्रिश भगत आपण जाणून घेऊ.
क्रिश भगत पंजाबचा २१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. तो मध्यमगती गोलंदाजी करतो आणि मध्यक्रमात फलंदाजी करतो. क्रिश भगत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि तो एक चांगला गोलंदाजदेखील आहे. क्रिश भगतच्या क्रिकेट कारकिर्दीप्रमाणे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाला काही माहीत नाही. क्रिशचे आजोबा भगत चुनी लाल ( चुन्नी लाल भगत) हे पंजाबमधील भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, वन आणि वन्यजीव संरक्षण आणि कामगार मंत्रालय या पदांचा पदभार सांभाळला. त्यांचे मुलगे आणि क्रिशचे मामा, मोहिंदर पाल भगत हे पंजाबच्या राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. 2024 मध्ये झालेल्या जालंधर पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी आम आदमी पार्टी कडून विजय मिळवला. विशेष म्हणजे, त्यांचे वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चुन्नीलाल भगत यांनी आपल्या मुलाच्या पाठीशी उभे राहत भाजप सोडून 'आप'ला पाठिंबा दिला होता. त्यांच्या या विजयानंतर त्यांची पंजाब मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली असून, सध्या मोहिंदर पाल भगत यांच्याकडे तीन खाती आहेत, ते सौरक्षण खातं, फलोत्पादन खातं आणि स्वातंत्र्यसैनिक कल्याण खातं यांचा पदभार सांभाळत आहेत.
तसेच क्रिशचे वडील अश्वनी भगत यांची स्वतःची क्रीडा साहित्य बनवणारी कंपनी आहे. 'सीला इंटरनॅशनल' हे कंपनीचं नाव असून ते क्रिकेट, हॉकी, फुटबॉल आणि बॉक्सिंगचे साहित्य बनवतात.
हेही वाचा – Virat Kohli: 'अनुष्का वहिनी बघताय ना…'; विराट कोहली पुन्हा सोशल मीडियावरील वादात अडकला; 'त्या' फोटोवरील एका 'लाईक'ने इंटरनेटवर खळबळ
क्रिश भगत हा पंजाबमधील एक जिद्दी क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो, ज्यांनी बर्टन पार्क येथे सराव करून आणि प्रशिक्षण घेऊन स्वतःचा खेळ घडवला आहे. त्याने 14 वर्षांखालील ते 23 वर्षांखालील पंजाबच्या सर्व संघांचे प्रतिनिधित्व केले. रणजी ट्रॉफीमध्येदेखील त्याने पंजाबसाठी पदार्पण केले. यापूर्वी त्याने आरसीबीसाठी 'नेट बॉलर' म्हणून काम केले होते, मात्र त्यावेळी त्याला मुख्य संघात स्थान मिळू शकले नव्हते. आता, अथर्व अंकोलेकर याला झालेल्या दुखापतीमुळे क्रिश भगत याची बदली खेळाडू म्हणून संघात निवड झाली. या संधीचं नक्कीच सोनं करणं हे त्याचं ध्येय असेल.